Support Non-profits: Join a short Online Course
मुलांच्या भाषा विकासामध्ये पालक, शिक्षक आणि इतर वयस्क यांचा बराच हातभार लागतो ह्यात काही शंका नाही. भाषा शिक्षणात शब्द कानावर पडत राहणं फार गरजेचं असत. त्यातून मुलं नकळत भाषा शिकत असत. हळू हळू ते अनुकरण करून बोलायला ही लागत. अर्थात ती प्रक्रिया खूप क्लिष्ट असते आणि हळुवार होत असते. त्यात पालक आणि शिक्षक म्हणून आपण काय भूमिका बजावू शकतो त्याबद्दल सौदाहरण ह्या लेखात जाणून घेऊयात.
पालक म्हणून अपर्णा आणि सचिन (मी) मिळून आमच्या जुळ्या मुली ईधा-ईवा ह्यांच्या बरोबर लक्षपूर्वक प्रयत्न करत असतांना आलेला एक अनुभव इथे मांडत आहे . पुढे वाचण्या पूर्वी खालील विडिओ बघावा. ईधा बोलायला शिकतांनाच हा एक विडिओ आहे.
ह्या विडिओमध्ये बघितल्या प्रमाणे ते ईधा नुकतीच एक शब्द बोलायला लागलीये. अपर्णा त्याला प्रतिसाद देतेय. ह्या उदाहरणातून आपण भाषा शिक्षणात आपली काय भूमिका असायला हवी हे जाणून घेऊयात.
१. मुलांना ते शब्द पुन्हा पुन्हा उच्चरण्याची संधी देणे
मुलं एखादा शब्द नव्याने शिकत तेव्हा काही स्वर आणि व्यंजनांची विशिष्ट जुळवणूक होत असते. त्यात स्नायूंना एका विशिष्ट प्रकारे क्रमवारपणे हालचाल करावी लागणार असते. त्यासाठी मेंदूला तश्या सूचना द्यावा लागणार असतात. हे सर्व होण्यासाठी सर्वात महत्वाच आहे, सराव त्यामुळे लहान मूळ एखादा शब्द नव्याने बोलायला लागल्यानंतर त्याला तो शब्द परत परत वापरण्याची संधी मिळायला हवी. ह्या विडिओ व्यवस्थित लक्ष देऊन बघितल्यास, ईधा पहिल्यांदा 'थांब' उच्चारते आणि शेवटी 'थांब' म्हणते ह्यात बराच फरक आहे. तोच शब्द पुन्हा पुन्हा उच्चरल्या मुळे उच्चारात स्पष्टता येत गेलेली तुम्हाला लगेच लक्षात येईल. ह्यातून सरावाचा महत्त्व लक्षात येईल.
२. शब्दांना वाक्यात बसवून उच्चाराने
प्रत्येक शब्द वाक्यात पेरल्या शिवाय त्याचा जीवन-उपयोग मुलांच्या लक्षात येत नाही. आपणही एखादा शब्द फक्त लक्षात राहावा म्हणून वाचून लक्षात ठेऊ शकत नये आणि तो राहिला तरी कालांतराने आपण तो विसरतो. शब्द नेमकं काय सूचित करतो हे समजण्यासाठी त्याचा पूर्ण वाक्यात उपयोग होणे गरजेचे असते. त्यातून त्याच व्याकरण ही स्पष्ट होत असत. ह्या विडिओ मध्ये बघितल्यास अपर्णा (आई) तोच शब्द शेवटी वाक्यात पेरून शब्द संवाद करत आहे. त्या पूर्ण वाक्यातून ईधाला शब्दाचा संदर्भ लागेल. अजून 'थांब' ह्या शब्दाचा अर्थ तिला कळला नसेल तरी हळू हळू तिला तो उलगायला लागेल.
३. मुलांना त्यांचा वेळ द्या
प्रत्येक मुलं आपआपल्या पद्धतीने भाषा शिकत असत. त्यांना त्यांचा वेळ मिळणं गरजेचं असत. भाषा शिकण्याची सुरुवात स्वरांची ओळख, मग अक्षर, मग शब्द, मग वाक्य आणि नंतर अर्थपूर्ण वाक्य. त्यानंतर व्याकरण आणि मग सामाजिक चौकटी, असा भाषेचा मोठा प्रवास होणार असतो. (अर्थात हे सर्व काही क्रमवार होत असं नाही). प्रत्येक मुलं त्यासाठी वेगवेगळा वेळ घेणार आहे, ह्याचे भान आपण मोठ्यांनी ठेवायला हवे. विडिओत बघितले तर लक्षात येईल शेवटी ईधा 'ना' हा शब्द वापरते. त्या शब्द साठीची ही प्रक्रिया बरीच आधी सुरु होऊन ती एका विशिष्ट पातळी पर्यंत पोहोचली आहे. त्याउलट 'थांब' ह्या शब्दाचा प्रवास आजच सुरु झालाय आणि तो किती दिवस चालेल ते आत्ताच सांगता येणार नाही. हा वेळ कालांतराने कमी कमी होत जातो.
४. मुलांना भाषा शिकण्याचा आनंद घेऊ द्या
मला असं वाटत हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. त्यातही शिक्षकांना हे आवर्जून सांगावेसे वाटते कि आपल्या विद्यार्थंना तो आनंद घेऊ द्या. शिक्षणासाठी ते अधिक अवघड असत आणि त्याची रास्त कारण आहेत. त्यांना एका वेळेस बऱ्याच मुलांकडे लक्ष द्यावं लागत आणि प्रत्येक विद्यार्थी वेगळ्या पातळीवर असत. वर्षभरात ठरलेले उपक्रम होणं सुद्धा आवश्यक असत. अश्या बऱ्याच मर्यादा त्यांच्यावर असतात. पण त्या मुलांना त्यातला आनंद मिळाला नाही तर ते मुलं मागे पडत राहील. ह्यात विडिओ मध्ये बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की ईधा नवीन काहीतरी करता येतंय ह्याचा तिला किती आनंद आहे. ती पुन्हा पुन्हा एकच शब्द बोलतेय. हा विडिओ छोटा आहे. त्या पलीकडे ती किती दिवस 'थांब' म्हणत राहील असेल ह्याची कल्पना करा. तिला तो आनंद मिळाला तर ती तसे कितीतरी शब्द स्वतः शिकेल. एक वेळ अशी येईल की तिला काही शिकवावं सुद्धा लागणार नाही.
५. तुम्हीही मुलांच्या भाषा शिकण्याचा आनंद घ्या
मुलांना भाषा शिकतांना बघणं ह्यात काय मजा हे कळलं की मोठे सुद्धा खूप सहज त्या प्रक्रियेचा भाग बनून जातात. ती अंगावर टाकलेली जबाबदारी वाटायला लागली की त्यात आनंद मिळू शकणार नाही. त्यातून तुम्ही स्वतः आणि मूल, दोघंही एका संधीला मुकाल. शिक्षकांना तर एकच गोष्ट प्रत्येक मुलं कश्या वेगवेगळ्या पद्धतीने शिकत हे जाणून घेण्याची किती छान संधी असते. तोच किती मोठा अभ्यासाचा आणि लिखाणाचा विषय होऊ शकतो. जागरूक पालक म्हणून आपणही मुलांच्या ह्या आनंदाचा भाग होऊ शकतो. त्यांनी एखादी छान गोष्टी केली असेल तर टाळी वाजवून आनंद साजरा करू शकतो. ह्या छोट्या-छोट्या गोष्टीतला आनंद आपल्याला काहीतरी नवीन करण्याची प्रेरणा देत असते.
अपर्णा -सचिन